जगायास तेव्हा खरा अर्थ होता……


जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थासही अर्थ भेटायचे
मनासारखा अर्थ लागायचा आणि मनासारखे शब्दही यायचे ||१||

नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे
निघुनी कधी शेवटी जात असता वळूनी कितीदातरी पाहायचे असते ||२||

उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुख दाटायचे
जरा एक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे ||३||

असे हि दिवस कि उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे
ॠतुंना ॠतुंनी जरा भागले कि नव्याने जुने झाड उगवायचे ||४||

मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे
मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे ||५||

आता सांज वेळी निघुनी घरातुनी दिशाहीन होवून चालायचे
आता पावूलेही दुखू लागली कि मीच त्यांना उरी घ्यायचे ||६||

|| जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरार्थासही अर्थ भेटायचे ||

– सौमित्र

About सचिन पवार

आयुष्याच्या या वाटेवर मी माझी वाट शोधतोय, वाहणारे अश्रु येतात जिथुन मी तो पाट शोधतोय.. मला व्यापलं आहे जीवनाने अन,मी माझी जागा शोधतोय, नात्यांच्या या रेशिम बंधातुन मी माझा धागा शोधतोय... मनात जे भरुन आहेत कधीचे मी त्या श्वासांना शोधतोय, जगण्याची जे उर्मी देतात मी त्या ध्यासांना शोधतोय.... खरं सांगायचं तर मी माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय....
This entry was posted in कविता. Bookmark the permalink.

यावर आपले मत नोंदवा